Skip to main content
Directory
Shweta Pendse Puranik

Shweta Pendse Puranik

Actress & Performer

Nagpur
Arts Icon
माझ्या शाळेबद्दल मला लिहायला सांगितलं की अजूनही हा प्रश्न पडतो की मी सुरुवात कुठून करू? आणि दुसरा प्रश्न हा की थांबू कुठे? सोमलवार शाळा... माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा पहिला टप्पा. मी ह्या शाळेच्या कुशीत काढलेल्या दहा वर्षांनी माझ्या संबंध आयुष्याची दिशा ठरवली. मला आज शाळेच्या वेबसाईटवर माझ्याकडून चार शब्द लिहिण्याची संधी मिळतेय हा मी माझा बहुमान समजते. आज कला क्षेत्रात जे काही थोडेफार यश माझ्या पदरात पडले आहे, ते मिळवण्यात खूप मोठा वाटा माझ्या शाळेचा आहे. विद्यादाना व्यतिरिक्त कमालीची शिस्तबद्धता, लाखमोलाचे संस्कार आणि मूल्य हे दान तर सोमलवार शाळेने तिच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिले आहेच पण कोणत्याही कामाच्या परिपूर्णतेसाठी लागणारी चिकाटी, मराठी भाषेएवढेच इंग्रजी आणि संस्कृत भाषांवर प्रभुत्व, अस्खलित शब्दोच्चार हा सहजासहजी कुठेही न मिळणारा ठेवादेखील दिला आहे. माझे लेखन असो, अध्यापन असो वा अभिनय मला पदोपदी ह्या गोष्टीची जाणीव होत राहिली आहे. तेव्हा शाळेच्या कडक नियम आणि कठोर शिस्तीत तावून सुलाखून निघालेले सगळेच विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशोशिखरांवर लख लख करतायत. शाळेच्या प्रेमळ छायेतून बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी जेव्हा प्रगती पथावर आगेकूच करताना शाळा बघते, तेव्हा तिचं ऊर निश्चितच समाधानाने भरून येत असेल. पण आज तसं काहीसं माझं झालंय, माझ्या शाळेच्या बाबतीत! दहावीची परीक्षा पास करून शाळेला निरोप दिला त्या दिवसापासून आजपर्यंत शाळेच्या पायाभूत घटकांपासून ते शिक्षण पद्धतीमध्ये होत गेलेले बदल आणि परिणामत: उभं राहिलेलं शाळेचं भव्य स्वरूप मी बघत आलेय. मात्र माझ्या सोमलवार शाळेच्या संकेतस्थळाची घोषणा ऐकून मला झालेला आनंद शब्दात न बांधता येणारा आहे. खऱ्या अर्थाने आईच्या मायेने नि आई इतक्याच निस्वार्थ भावनेने, तिच्या छायेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक उत्तम माणूस बनवण्यासाठी झटणारी आणि बडेजाव नाकारत साधेपणाने प्रामाणिक अध्यापन करत आलेली माझी शाळा, आता कात टाकतेय. आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या रूपाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या ह्या शाळेपर्यंत आता जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक पोहोचू शकतील. अतिशय आनंद आहे आणि खूप समाधानही!!

Acclaimed actress and performer. Studied for ten years at Somalwar School. Credits the school for discipline, values, command over Marathi, English and Sanskrit, and the foundation of her career in arts.

Back to Directory
Shweta Pendse Puranik · Alumni · Somalwar Ramdaspeth | Somalwar Ramdaspeth